टीम इंडिया आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याच्या निर्धाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हे एकमेव लक्ष्यच टीम इंडियासमोर नसणार आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. 2 ऑक्टोबरपासून आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ 115 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि सहा गुणांच्या पिछाडीसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावह आहेत. दक्षिण आफ्रिका ( 108) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने मायदेशात होणारी कसोटी मालिका गमावल्यास त्यांचे अव्वल स्थानही जाऊ शकते. आफ्रिका थेट तिसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानावर झेप मारू शकते.
कसं असेल समिकरण?
- भारतीय संघाने 0-1 अशा फरकाने मालिका गमावल्यास त्यांच्या खात्यात 112 गुण होती, तर दक्षिण आफ्रिका 112 गुणांसह अव्वल स्थानावर कब्जा करेल. आफ्रिकेनं 2-1 अशी मालिका जिंकल्यानंतरही दोन्ही संघांच्या गुणांची सख्या तेवढीच राहिल.
- दक्षिण आफ्रिकेनं ही मालिका 2-0 किंवा 3-0 अशी जिंकल्यास अव्वल स्थानावरील त्यांची पकड मजबूत होईल आणि दुसऱ्या स्थानावर गेलेल्या भारतीय संघ आणि त्यांच्यातील गुणांचे अंतर हे 2 किंवा 7 इतके असेल.
- भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवल्यास त्यांचे अव्वल स्थान कायम राहिल. त्यांचे गुण 114 अशे होतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 13 कसोटी मालिका झाल्या असून आफ्रिकेनं 7-3 अशी आघाडी घेतली आहे. तर उर्वरित तीन मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत. यापैकी सहावेळा आफ्रिकेनं भारत दौरा केला आहे आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन-दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. दोन मालिका बरोबरीत सुटल्या. सामन्यांचा विचार केल्यात आफ्रिकेनं 36पैकी 15 विजय मिळवले आहेत, तर भारताला 10 विजय मिळता आले.
दक्षिण आफ्रिकेनं 2015मध्ये भारत दौरा केला होता आणि त्यात भारतानं 3-0 असा मालिका विजय मिळवला होता. 11 वर्षांत आफ्रिकेनं प्रथमच परदेशात कसोटी मालिका गमावली होती.