भारतीय संघाने दुसऱ्या डावात केलेल्या खराब फलंदाजीचा फटका दुसऱ्या कसोटीच्या निकालाला बसला. भारताने आफ्रिकेविरूद्धचा सामना गमावला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आली. दुसऱ्या डावात ऋषभ पंतने अतिशय बेजबाबदार फटका मारला आणि तो शून्यावर बाद झाला. त्याच्या त्या फटक्यानंतर पंतवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. पण १९८३ च्या विश्वविजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी मात्र पंतची बाजू घेतली. ऋषभ पंत जरी मॅचविनर असला तरी त्यालाही आता थोडा ब्रेक दिला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.
"ऋषभ पंतला आता थोडा ब्रेक द्यायला हवा. तुमच्याकडे वृद्धिमान साहा सारखा उत्तम यष्टीरक्षक असताना पंतला विश्रांती देण्यात काहीच हरकत नाही. पंत हा खूप चांगली फलंदाजी करतो. तो खूप उत्तम यष्टीरक्षण करू शकतो हे साऱ्यांनाच माहिती आहे पण पंतने आता स्वत: ठरवायला हवं की कसोटी क्रिकेटमध्ये त्याला कशी फलंदाजी करायची आहे. जर पंतला स्वत:च्या फलंदाजीबाबत काही प्रश्न पडत असतील तर त्याला विश्रांती देणंच योग्य आहे", असं मत मदन लाल यांनी व्यक्त केलं.
ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सतत क्रिकेट खेळतोय. बायो बबलमध्ये विविध देशांचे दौरे त्याने केले आहेत. पंतची फलंदाजी अप्रतिम आहे यात वाद नाही. त्याने वेळोवेळी आपली फलंदाजी उपयुक्त असल्याचं दाखवून दिलं आहे. पण कसोटी सामन्यांसाठी एक विशिष्ट फलंदाजी करणं आवश्यक असतं. पंत जर स्वत:च्या फलंदाजीबाबत साशंक असेल तर त्याने विश्रांती घ्यायलाच हवी. तो मॅचविनर आहे. पण तो अशी फलंदाजी करू शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वत:साठी नव्हे तर संघासाठी फलंदाजी करायची असते", असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी ऋषभ पंतला दिला.
Web Title: India vs South Africa Tests Rishabh Pant should take a break now as batting failures can not be tolerated every time says Madan Lal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.