मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या आक्रमकतेमुळे अधिक ओळखला जातो. क्रिकेटचा फॉरमॅट कुठलाही असला तरी कोहलीची आक्रमकता तिच असते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही त्याची प्रचिती आली. क्षेत्ररक्षकांच्या ढिसाळ कामगिरीवर नाराजी प्रकट करताना कोहलीनं चक्क स्टम्प उखडून टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
टीम इंडियाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्स राखून विजय मिळवताना 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या 5 बाद 149 असे आव्हान भारतीय संघाने 19 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रोहित शर्माचा विक्रम मोडला. शिवाय त्यानं ट्वेंटी-20 सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही नावावर केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डावातील 10 व्या षटकात कोहलीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. श्रेयस अय्यरकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकीमुळे आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक आणि तेंबा बावुमा यांना एक अतिरिक्त धाव घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर चेंडू पकडण्यासाठी गोलंदाज हार्दिक पांड्याही यष्टिंजवळ नव्हता. त्यामुळे कोहलीचा पारा आणखी चढला. त्याच रागात त्यानं स्टम्प उखडून टाकला.
पाहा व्हिडीओ...
शिवाय कोहीलनं क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 50+सरासरीनं धावा केल्या आहेत. तीनही फॉरमॅटमध्ये 50+ सरासरी असलेला सध्याच्या घडितील तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 79 सामन्यांत 53.14 च्या सरासरीनं 6749 धावा केल्या आहेत. वन डेत त्याच्या नावावर 239 सामन्यांत 60.31 च्या सरासरीनं 11520 धावा, तर ट्वेंटी-20 त 71 सामन्यांत 50.85च्या सरासरीनं 2441 धावा आहेत.