मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : टीम इंडियाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्स राखून विजय मिळवताना 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या 5 बाद 149 असे आव्हान भारतीय संघाने 19 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. गोलंदाजीत दीपक चहरने दोन विकेट्स घेत योगदान दिले.
या सामन्यात कोहलीनं 72 धावांची खेळी करताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रोहित शर्माचा विक्रम मोडला. आता ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. शिवाय त्यानं ट्वेंटी-20 सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही नावावर केला आहे. पण, या व्यतिरिक्त कोहलीनं काल अशा विक्रमाला गवसणी घातली आहे की सध्याच्या घडीला अशी नोंद करणारा जगातला तो एकमेव फलंदाज आहे.
या सामन्यात रोहितला 12 धावा करता आल्या. 72 धावांची खेळी करून कोहलीनं ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. कोहलीच्या नावावर 2441 धावा आहेत, तर 2434 धावांसह रोहित आता दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत.
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील कोहलीचे हे 22 वे अर्धशतकं ठरले आणि ट्वेंटी-20 सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( 13), आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग (12), दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी ( 11) आणि एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद हाफिज, एच मसाकात्झा, इयॉन मॉर्गन, कुसल परेरा, बाबर आझम आणि मार्लोन सॅम्युअल्स ( प्रत्येकी 10) यांचा क्रमांक येतो.