India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया रवाना होण्यापूर्वी रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. क्वारंटाईन कालावधी सुरू होण्याआधी सराव सत्रात रोहित शर्माला दुखापत झाली आणि त्यानं कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर काल दिवसभर विराट कोहली ( Virat Kohli) वन डे मालिकेत खेळणार नसल्याची चर्चा सुरू होती. प्रत्येक जण बीसीसीआयच्या वेगवेगळ्या सूत्रांचा हवाला देताना वेगवेगळ्या बातम्या देताना दिसत होते. त्यात आता क्रिकबजनं दिलेल्या ताज्या वृत्तानुसार विराट कोहली वन डे मालिकेत खेळणार आहे, त्यानं बीसीसीआयकडे विश्रांतीची कोणतीच विनंती केली नव्हती. पण, त्याचवेळी आता रोहितचे कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेत खेळणे अनिश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे.
विराट आज प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि तेव्हाच याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. पण, बीसीसीआयच्या ताज्या माहितीनुसार विराट कोहली वन डे मालिकेतही खेळार आहे. १९ जानेवारीपासून ही मालिका सुरू होत आहे.''विराट वन डे मालिकेतून माघार घेणार, या वृत्तात काहीच तथ्य नाही. तो क्रिकेटपती समर्पित आहे आणि त्याच्या सहभागाविषयी कोणतीच शंका नाही,''असे बीसीसीआय सदस्यानं क्रिकबजला सांगितले.
वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यामुळे विराट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्या नाराजीमुळेच विराट वन डे मालिकेतून माघार घेत असल्याचे बोलले जात होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे संघाची घोषणा २६ डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलनंतर केली जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या सहभागाविषयी अनिश्चितता...
दरम्यान, दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या वन डे मालिकेत खेळण्यावर अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. हॅमस्ट्रींग इंजरी मुळे रोहितनं कसोटी मालिकेतून माघार घेतलती. बीसीसीआयचे फिजिओ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहेत.