नवी दिल्ली : माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने द. आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीसाठी संघनिवडीवर भारतीय कर्णधाराविरुद्ध जोरदार हल्ला चढविला आहे. विराट कोहली जर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीत अपयशी ठरल्यास त्याने स्वत:ला अंतिम संघातून बाहेर ठेवायला हवे, असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले. सेहवागने म्हटले, ‘‘शिखर धवनला फक्त एका कसोटीत अपयशी ठरल्यानंतर आणि भुवनेश्वरला कोणतेही कारण नसताना संघाबाहेर ठेवण्याचा विराट कोहलीचा निर्णय पाहता जर तो स्वत: सेंच्युरियनमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तर त्याने तिस-या कसोटीच्या अंतिम संघातून स्वत:ला बाहेर ठेवायला हवे.भुवनेश्वरला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य नव्हता. त्यामुळे विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारचा आत्मविश्वास कमी केला आहे. ईशांत शर्माला त्याच्या उंचीचा फायदा होऊ शकतो. विराट त्याला अन्य गोलंदाजांच्या बदल्यात खेळवू शकला असता.भुवनेश्वरने केपटाऊनमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि अशा प्रकारे त्याला संघाबाहेर ठेवणे अयोग्य आहे.’’असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले.
शिखर धवन बनला ‘बळीचा बकरा’, निवडीवर नेहमीच ‘टांगती तलवार’ - सुनील गावस्कर
दुस-या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहलीवर सडकून टीका केली. विराटने सलामीवीर शिखर धवन याला ‘बळीचा बकरा’ बनविले असून त्याच्या निवडीवर नेहमीच ‘टांगती तलवार’ असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे.‘सन्नी’ म्हणाले, ‘माझ्या मते शिखरला बळीचा बकरा बनविण्यात आले. त्याच्या निवडीवर नेहमीच टांगती तलवार असते. एखादी खराब खेळी झाली, की त्याला बाहेर बसविले जाते. भुवनेश्वरऐवजी ईशांतला झुकते माप का देण्यात आले, हे माझ्या आकलनापलिकडचे आहे. शमी किंवा बुमराह यांच्याऐवजी ईशांतला घेता आले असते. भुवनेश्वरला राखीव बाकावर बसविणे हे ‘कोडे’ आहे.कोहलीचे समीकरण...रोहित शर्मालाच अन्य खेळाडूंच्या तुलनेत झुकते माप का दिले जाते? कर्णधार कोहलीची यामागील समीकरणे काय आहेत? केपटाऊनच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर रोहित चाचपडत राहिला. तरीही त्याला वारंवार संधी दिली जात आहे.कोहलीचा तो आवडता खेळाडू बनला, असे दिसते. रोहितने विदेशात १५ कसोटींत २५.११ च्या सरासरीने ६५३ धावा केल्या. त्याच्या तुलनेत अजिंक्य रहाणेचा रेकॉर्ड अधिक चांगला आहे.अजिंक्यने २४ कसोटींत ५३.४४ च्या सरासरीने १८१७ धावा केल्या असून त्यात सहा शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. द. आफ्रिकेतील दोन कसोटींत रहाणेने याआधी ६९.६६ च्या सरासरीने २०९ धावा ठोकल्या.उपकर्णधार अजिंक्य रहाणेला प्रतीक्षाच...अजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा वगळण्यात आले. अकरा जणांत अजिंक्यचा समावेश न केल्याबद्दल दिग्गजांचे डोके ठणकले आहे. ही सर्वांत मोठी चूक असल्याचे त्यांचे मत असले तरी संघव्यवस्थापन निर्णयावर ठाम आहे. विदेशी मैदानांवर सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेला उपकर्णधार रहाणे ११ जणांत खेळण्यास वारंवार आसुसलेला असतो, पण संधीअभावी बाहेरच बसून राहतो.