IND vs SA Live Scorecard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारताच्या आघाडीच्या फळीने चुकीचे फटके खेचून विकेट फेकल्या. पण, विराट कोहली व अक्षर पटेल चतुराईने खेळले आणि दोघांच्या ७२ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. अक्षर दुर्दैविरित्या रन आऊट झाल्यानंतर विराटने गिअर बदलला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा ( ९) , रिषभ पंत ( ०) व सूर्यकुमार यादव ( ३) हे ३४ धावांत माघारी परतले. अक्षरने ३१ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २७ धावा चोपल्या. विराट ५९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ७ बाद १७६ धावा उभ्या केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठऱली. यापूर्वी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध २ बाद १७३ धावा केल्या होत्या.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला धक्का देताना रिझा हेंड्रिक्सचा ( ४) अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला. अर्शदीप सिंगने तिसऱ्या षटकात एडन मार्करामला ( ४) बाद करताच रोहित व विराटने भारी जल्लोष केला. या विकेटचं महत्त्व त्यांना चांगलेच माहित होते. त्रिस्तान स्तब्सला चौथ्या क्रमांकावर प्रमोशन मिळाले आणि क्विंटन डी कॉकसह त्याने संघाला पॉवर प्लेमध्ये २ बाद ४२ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ९व्या षटकात स्टम्प मोकळे ठेवून ऑफ साईडला येत फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्तब्सला अक्षरने त्रिफळाचीत केले. स्तब्स २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला आणि क्विंटनसह त्याची ५८ ( ३८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. आफ्रिकने १० षटकांत ३ बाद ८१ केल्या, तेच पहिल्या १० षटकांत भारताच्या ३ बाद ७५ धावा होत्या.
रवींद्र जडेजाने टाकलेल्या ११व्या षटकात १२ धावा कुटल्या गेल्या. अर्शदीपला १३व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आणणे भारताला फलदायी ठरले. अर्शदीपने फाईन लेगला चौकार मिळाल्यानंतर क्विंटनला ( ३९) पुन्हा तसाच फटका मारण्यास भाग पाडले आणि कुलदीपने अचूक झेल टिपला. हेनरिच क्लासेनसोबत त्याची ३६ धावांची भागीदारी तुटली. पण, क्लासेन मैदानावर उभा होता आणि त्याने सामना ३६ चेंडूंत ५६ धावा असा कट टू कट आणला. अक्षरने टाकलेल्या १५व्या षटकात क्लासेनने २४ धावा चोपून सामना पूर्णपणे फिरवला. रोहितने नंतर अनुभवी गोलंदाज बुमराहला लगेल आणले.
अक्षर ( १-४९) व कुलदीप ( ०-४५) हे भारताचे आतापर्यंतचे अनुभवी गोलंदाज आज महागडे ठरले. क्लासेनने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. २४ चेंडूंत २६ धावा हव्या असताना हार्दिकने मोठी विकेट मिळवून दिली. क्लासेन २७ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांवर झेलबाद झाला. १८ चेंडूंत २२ धावा आफ्रिकेला हव्या होत्या आणि डेव्हिड मिलर हा शेवटचा स्पेशालिस्ट फलंदाज मैदानावर उभा होता. बुमराहने टाकलेले १८वे षटक निर्णायक ठरले आणि त्याने मार्को यान्सेनचा ( २) भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. केवळ २ धावा त्या षटकात आल्याने आफ्रिकेला १२ चेंडूंत २० धावा अजूनही हव्या होत्या. अर्शदीपने १९व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या.
हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला. भारताने ८ धावांनी सामना जिंकला.
Web Title: India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - India won T20 World Cup after 17 years, Rohit Sharma and India's dream come true, beat South Africa in Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.