मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : टीम इंडियाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्स राखून विजय मिळवताना 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या 5 बाद 149 असे आव्हान भारतीय संघाने 19 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रोहित शर्माचा विक्रम मोडला. शिवाय त्यानं ट्वेंटी-20 सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही नावावर केला आहे.
या सामन्यात रोहितला 12 धावा करता आल्या. 72 धावांची खेळी करून कोहलीनं ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. कोहलीच्या नावावर 2441 धावा आहेत, तर 2434 धावांसह रोहित आता दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत.
कोहलीनं असा विक्रम नोंदवला की सध्याच्या घडीला अशी कामगिरी करणारा कोहली जगातला एकमेव फलंदाज आहे. कोहीलनं क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 50+सरासरीनं धावा केल्या आहेत. तीनही फॉरमॅटमध्ये 50+ सरासरी असलेला सध्याच्या घडितील तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 79 सामन्यांत 53.14 च्या सरासरीनं 6749 धावा केल्या आहेत. वन डेत त्याच्या नावावर 239 सामन्यांत 60.31 च्या सरासरीनं 11520 धावा, तर ट्वेंटी-20 त 71 सामन्यांत 50.85च्या सरासरीनं 2441 धावा आहेत.
कोहलीच्या या पराक्रमाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही ( आयसीसी) कौतुक केले. त्यांनी कोहलीचा एक फोटो ट्विट करून कौतुकाची थाप मारली. पाकिस्तानी माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनं ते ट्विट पुन्हा शेअर करताना कोहलीबद्दल विधान केले. तो म्हणाला,'' विराट तुझे अभिनंदन. तू सर्वोत्तम खेळाडू आहेस. अशीच प्रगती करत रहा आणि जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करत रहा, या शुभेच्छा.''