मुंबई- कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली. कॅप्टन विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने डर्बन येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. पण या सामन्यात सलामीवीर शिखर धवन मैदानात असताना, विराट कोहलीसोबत धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन रनआऊट झाला. विकेट गेल्यानंतर नाराज झालेल्या शिखर धवनने भर मैदानात विराटसमोर आपली नाराजी व्यक्त करत आपला असंतोष व्यक्त केला.
शिखर धवन रनआऊट झाल्यानंतर ट्विटरवर नेटिझन्सने मजेशीर फटकारे शेअर करायला सुरूवात केली. शिखर धवन ज्याप्रकारे आऊट झाला त्या मुद्यावर विविध मेम्स शेअर करण्यात आले. 'कधीही न पाहिलेली घटना. रनआऊट झाल्यानंतर मैदानात शिव्या देणार बॅट्समन, पण तो विराट कोहली नाही, ' अशा आशयाचे विविध मेम्स नेटिझन्सने शेअर केले. वन-डे सामन्यात विराटसोबत खेळत असताना दोनवेळा आऊट झालेला बॅट्समन हा शिखर धवनच, असंही अनेकांनी म्हंटलं.
भारतीय डावाच्या 13 व्या ओव्हरमध्ये ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला. एडन मार्क्रमच्या बॉलवर रनआऊट होऊन शिखर माघारी परतला. हा रन्स काढण्यासाठी शिखर धवन उत्सुक नव्हता. मात्र कर्णधार विराट कोहलीने धाव घेतल्यामुळे त्याला ही धाव घ्यावी लागली होती. पण त्यातच शिखर धवनला रनआऊट व्हावं लागलं.