India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या युवा संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महान फलंदाज राहुल द्रविडही प्रथमच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. भारताचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना पाठवले. आज पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पदार्पण केले आहे. ( Ishan Kishan and Suryakumar Yadav making the ODI debut for India)
टीम इंडियाचे नेतृत्व करणारा शिखर धवन हा २५वा खेळाडू आहे. वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावा करण्यासाठी त्याला २३ धावांची गरज आहे आणि हा पल्ला पार करणारा तो १०वा भारतीय फलंदाज ठरणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या या अखेरच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत विराट व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नजर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत निवडल्या जाणाऱ्या संभाव्य खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यावर चाचपणी केली जाईल आणि तसे संकेत धवननं दिले होते. त्यानुसार आज मुंबई इंडियन्सच्या इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे.