भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना आज गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच मालिकेत दणक्यात सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता आतापासून होणारी प्रत्येक ट्वेंटी-20 मालिका ही टीम इंडियासाठी महत्त्वाची असणार आहे. या मालिकांमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघाची निवड केली जाणार आहे. पण, श्रीलंकेचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाच्या चमूत चिंता वाढवणारी गोष्ट घडली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
शनिवारी सराव करताना कोहलीच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. कोहलीनं तातडीनं फिजिओ नितीन पटेल यांची मदत घेतली आणि करंगळीवर स्प्रे मारून घेतला. सरावात झेल घेताना कोहलीला ही दुखापत झाली. त्याची ही दुखापत गंभीर असल्यास तो आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवींद्र जडेजानं या सराव सत्रात सहभाग घेतला नाही, कारण तो उशीरानं गुवाहाटी येथे दाखल झाला.
या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते आणि या मालिकेतून ते कमबॅक करत आहेत. धवनच्या उपस्थितीत लोकेश राहुलनं सलामीची जबाबदारी चोखपणे पार पाडली. पण, आता सलामीला तो लोकेशला साथ देण्यासाठी उत्सुक आहे.
टीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
श्रीलंका - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा.