भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने ४ बाद १०८ धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानापुढे श्रीलंकन फलंदाजांनी गुडघेच टेकले. त्याआधी रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५, रिषभ पंतच्या ९६, रविचंद्रन अश्विनच्या ६१ आणि हनुमा विहारीच्या ५८ धावांच्या बळावर भारताने ८ बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीच्या वेळी एक विचित्र प्रकार घडला.
रोहित शर्माने गोलंदाजी योग्य ते बदल करत जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली. टी२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या निशांकाला बाद करण्याची जबाबदारी बुमराहवर होती. त्यानुसार बुमराहने गोलंदाजी केली. अतिशय स्मार्ट गोलंदाजी करत आणि वेगात बदल करत त्याने निशांकाचा त्रिफळा उडवला. निशांकाही मैदानाबाहेर चालू लागला. त्यावेळी जोरात भोंगा वाजला आणि नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे बाद असूनही नो बॉलमुळे त्याने जीवदान मिळालं.
निशांकाला मिळालेल्या जीवदानाचा त्याने नीट वापर केला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो नाबाद राहिला. चारिथ असालांकासोबत त्याने शेवटपर्यंत तग धरला. तत्पूर्वी दिमुथ करूणरत्ने २८, लाहिरून थिरीमने १७, अँजेलो मॅथ्यूज २२ आणि धनंजय डि सिल्वा १ धाव काढून माघारी परतला. निशांका मात्र २६ धावांवर नाबाद आहे.