भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे नववर्षातील पहिल्या लढतीत टीम इंडियाच्या शिलेदारांचा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागली. आज ती प्रतीक्षा संपणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यावरही अनिश्चिततेचं संकट असल्याची चिन्ह आहेत, परंतु यावेळी क्रिकेटप्रेमी व सामना यांच्यात पाऊस नव्हे, तर दव फॅक्टर खोडा घालू शकतो. पण, त्यावर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननं जालीम उपाय शोधला आहे. त्यांनी दव फॅक्टरवर मात करण्यासाठी स्पेशल केमिकल मागवले आहे.
मध्य प्रदेशमधील इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. पण, येथील हवामान पाहता येथे दव फॅक्टर सामन्यात व्यत्यत निर्माण करू शकतो. त्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन सज्ज असून खेळपट्टीवर स्पेशल केमिकलची फवारणी करण्यात आली आहे.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार मुख्य क्युरेटर समंदर सिंग चौहान यांनी सांगितले की,''खेळपट्टीवर दव असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मैदानावर स्पेशल केमिकलची फवारणी केली जात आहे. शिवाय गेल्या तीन दिवसांपासून मैदानावरील गवतावर पाण्याची फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे दव कमी निर्माण होतील. चाहत्यांना या सामन्यात चौकार- षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.''
हा सामना सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे दव फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. विशेषतः दुसऱ्या सत्रात दव फॅक्टरमुळे खेळाडूंना त्रास जाणवू शकतो. गुवाहाटी येथील पहिला सामना रद्द झाल्यानंतर चाहते या सामन्यासाठी प्रचंड आतूर आहेत. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना 10 जानेवारीला पुण्यात होणार आहे.
संभाव्य संघटीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
श्रीलंका - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा.