भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 2020 ची सुरुवात दणक्यात केली. विराटनं आपल्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला केवळ विजय मिळवून दिला नाही, तर स्वतःच्या नावे विश्वविक्रमाचीही नोंद केली. श्रीलंकेच्या 9 बाद 142 धावांचा टीम इंडियानं 17.3 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा शिखर धवनसह लोकेश राहुल, श्रेयस अय्यर आणि विराट यांनी दमदार खेळी केली. टीम इंडियानं यासह या वर्षाची विजयानं सुरुवात केली. या सामन्यात विराटनं आणखी एक जलद पराक्रम करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह अनेक दिग्गजांचा विक्रम मोडला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेनं 9 बाद 142 धावा केल्या. या सामन्यातून कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे स्टार ठरले. शार्दूलनं 23 धावांत 3, तर सैनीनं 18 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सैनीनं 147.5च्या गतीनं यॉर्कर टाकून दनुष्का गुणथिलकाचा ( 20) त्रिफळा उडवला. लंकेकडून अविष्का फर्नांडो ( 22) आणि कुसल परेरा ( 34) यांनी साजेसा खेळ केला. कुलदीप यादवनेही दोन विकेट घेतल्या.
विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video
2020तील पहिलीच धाव अन् विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड!
लक्ष्याचा पाठलाग करताना पुनरागमन करणाऱ्या शिखर धवननं सलामीवीर लोकेश राहुलला तोडीसतोड साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. राहुल 32 चेंडूंत 6 चौकाराच्या मदतीनं 45 धावा करून माघारी परतला. त्यानंतर धवनही 29 चेंडूंत 32 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 26 चेंडूंत 34 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं 17 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 30 धावा केल्या. या खेळीसह विराटनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावांचा पल्ला पार केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांत विराटनं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 30 डावांमध्ये 1000 धावा केल्या. यासह त्यानं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा ( 31 डाव) विक्रम मोडला. या विक्रमात न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( 36 डाव) तिसऱ्या, इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( 42 डाव) चौथ्या, आयर्लंडचा विलयम पोर्टरफिल्ड ( 54 डाव ) पाचव्या आणि भारताचा महेंद्रसिंग धोनी ( 57 डाव) सहाव्या क्रमांकावर आहेत.