टीम इंडियानं नववर्षाची विजयानं सुरुवात केली. भारत विरुद्ध श्रीलंका ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं इंदूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्स व 15 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी दमदार खेळ केला. वियजासाठीचे 143 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 17.3 षटकांत सहज पार केले. या सामन्यातून भारतानं नववर्षाची विजयानं सुरुवात केली, परंतु कर्णधार विराट कोहलीनंही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या सामन्यातील विराटची पहिली धाव ही विश्वविक्रमी ठरली.
विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेनं 9 बाद 142 धावा केल्या. या सामन्यातून कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे स्टार ठरले. शार्दूलनं 23 धावांत 3, तर सैनीनं 18 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सैनीनं 147.5च्या गतीनं यॉर्कर टाकून दनुष्का गुणथिलकाचा ( 20) त्रिफळा उडवला. लंकेकडून अविष्का फर्नांडो ( 22) आणि कुसल परेरा ( 34) यांनी साजेसा खेळ केला. कुलदीप यादवनेही दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पुनरागमन करणाऱ्या शिखर धवननं सलामीवीर लोकेश राहुलला तोडीसतोड साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. राहुल 32 चेंडूंत 6 चौकाराच्या मदतीनं 45 धावा करून माघारी परतला. त्यानंतर धवनही 29 चेंडूंत 32 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 26 चेंडूंत 34 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं 17 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 30 धावा केल्या. पण, विराटच्या पहिल्या धावेनं विश्वविक्रम केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान विराटला या पहिल्या धावेनं मिळवून दिला. 2019 वर्षाची सांगता करताना विराट आणि रोहित शर्मा हे दोघं भारतीय फलंदाज आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत अव्वल दोन स्थानावर होते. विराट आणि रोहित यांच्या खात्यात प्रत्येकी 2633 धावा होत्या. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील पहिली धाव विराटला या विक्रमात अव्वल स्थानी विराजमान करणारी ठरली. विराटच्या खात्यात आता 77 सामन्यांत 2663 धावा जमा झाल्या आहेत. त्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितनं 104 सामन्यांत 2633 धावा केल्या आणि त्यात 4 शतकं व 19 अर्धशतकं आहेत.