3 challenges for Charith Asalanka, IND vs SL: श्रीलंका विरूद्ध भारत टी२० मालिकेचा शुभारंभ २७ जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ सोमवारी लंकेत दाखल झाला. २७, २८ आणि ३० जुलै रोजी टी२० मालिकेतील सामने पल्लेकल येथे रंगणार आहेत. कर्णधार रोहितने टी२०तून निवृत्ती स्वीकारल्यानंतर या मालिकेसाठी भारताने सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड केली आहे. श्रीलंकेलाही नवा कर्णधार मिळाला असून मंगळवारी संघाची घोषणा करण्यात आली. टी२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी आता नव्याने कर्णधार झालेल्या चरिथ असलंका याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. नुकताच टी२० विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय संघासमोर मैदानात उतरताना चरिथ असलंका याला तीन महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
१. संघाचे मनोबल उंचावणे-
टी२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या संघाला पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्यामुळेच हसरंगाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत संघाचे मनोबल उंचावण्याचे सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेचा नवा कर्णधार चरिथ असलंका याच्यासमोर असणार आहे. या संघात दिनेश चंडीमल आणि कुसल परेरा हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या साथीने नव्याने संघबांधणी करण्याचा प्रयत्न नव्या कर्णधाराला करायचा आहे.
२. संघाच्या कामगिरीतील सातत्य टिकवणे-
२०१४ साली टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुढील चार हंगामात श्रीलंकेला एकदाही उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. २०२६ मधील आगामी टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच संघातील खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य राखण्याचे मोठे आव्हान कर्णधार चरिथ असलंकाच्या पुढ्यात असेल.
३. कर्णधार पदासोबतच फलंदाजीची आघाडी सांभाळणे-
चरिथ असंलका हा श्रीलंकन संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला कर्णधाराची जबाबदारी सांभाळण्यासोबतच फलंदाजीतही कमाल करावी लागणार आहे. लंका प्रिमियर लीगमध्ये संघाला विजेतेपद मिळवून देताना त्याने ११ सामन्यात १७३ धावा केल्या होत्या. तशीच दमदार कामगिरी त्याला आताही करावी लागणार आहे.