नवी दिल्ली : भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली असल्यामुळे या सामन्यात संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. अखेरच्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार सुरूवात केली.
पहिल्या बळीसाठी भारतीय सलामीवीरांनी 95 धावांची भागीदारी नोंदवली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आपल्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर बाद झाला. हिटमॅनने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव टाकला होता. पण पाहुण्या संघाने पुनरागमन करताना चमिका करूणारत्नेने रोहितला बाद करून श्रीलंकेच्या चाहत्यांना जागे केले. पण शुबमन गिलने एका बाजूने धावसंख्या वाढवत नेली. ज्याला किंग कोहलीने चांगली साथ दिली.
शुबमन गिलचे शतक शुबमन गिलने सुरूवातीपासून ताबडतोब खेळी करून डावाची सुरूवात केली. त्याने एकाच षटकांत 4 चौकार ठोकून आपले लक्ष्य दाखवून दिले होते. त्याने 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 89 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. 31 षटकांपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद 202 एवढी झाली आहे. तर विराट कोहली (50) आणि शुबमन गिल (100) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत.
भारतीय संघात मोठा बदल भारताने दोन्ही वन डे सामन्यात सहज विजय मिळवला. पहिल्या वन डेत विराट कोहलीचे शतक महत्त्वाचे ठरले, तर दुसऱ्या वन डेत कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचा अचूक मारा आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देऊन आज इशान किशन व सूर्यकुमार यादव याला संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मोहम्मद शमीलाही विश्रांती मिळेल अशी शक्यता होती. हार्दिक पांड्या व उमरान मलिक यांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर व सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद समी, मोहम्मद सिराज.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"