भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियानं दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाचा महत्त्वाचा आहे. टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संघात तीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेनं या सामन्यात टीम इंडियाला फलंदाजीला बोलवून संधी साधली...
India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल
कर्णधार विराट कोहली या सामन्यात तरी बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देईल का, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर कोहलीनं संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि मनीष पांडे यांना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली आहे. कोहली म्हणाला, '' आम्हालाही पहिली फलंदाजीच करायची होती. आजच्या सामन्यात कुलदीपच्या जागी चहलला संधी मिळाली आहे. संजू सॅमसन आणि मनीष पांडे हे रिषभ पंत व शिवमच्या जागी संघात खेळणार आहेत.''
भारतात झालेल्या मागील 14 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत 11 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकले आहेत. पुण्यातील स्टेडियमचा विचार करायचा झाल्यास येथे झालेले दोन्ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.