कोलंबो : ‘संघातील सर्व खेळाडूंना एकजुटीने ठेवण्यात आणि त्यांना मानसिक स्थितीने सकारात्मक ठेवण्याचे काम कर्णधाराचे असते. मीसुद्धा याच दृष्टीने काम करेन,’ असा विश्वास श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शिखर धवन याने व्यक्त केला.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर व्यस्त असल्याने बीसीसीआयने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर धवनच्या नेतृत्त्वात भारताचा दुसरा संघ पाठवला आहे. १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल.
धवनने फॉलो द ब्ल्यूज या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे माझ्यासाठी खूप मोठे यश असून, मला मिळालेली मोठी संधी आहे. एक कर्णधार म्हणून सर्वांनी एकजूटता दाखवून आनंदी रहावे, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
आमच्याकडे चांगला संघ आणि शानदार सहयोगी स्टाफ आहे. आम्ही याआधीही एकत्रित काम केलेले आहे.’ या दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी धवन म्हणाला, ‘राहुल भाईसोबत माझे संबंध खूप चांगले आहेत. रणजी क्रिकेटमध्ये जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मी त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. भारत अ संघाकडून खेळताना मी कर्णधार होतो आणि त्यावेळी प्रशिक्षक म्हणून द्रविडच होते. त्यामुळे आमची चांगल्याप्रकारे चर्चा होते. ज्यावेळी द्रविड यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची (एनसीए) जबाबदारी आली, तेव्हा आम्ही सुमारे २० दिवस तिथे जात होतो. त्यामुळे त्यांच्यासोबत खूप चर्चा व्हायची. आता आम्हाला सहा सामने एकत्र खेळण्याची संधी मिळाल्याने मजा येईल.’