लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात आज श्रीलंकेचा सामना करणार आहे. गुणतालिकेत भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दोन्ही संघ आज साखळी फेरीतील आपापला अखेरचा सामना खेळणार आहे आणि या निकालानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित होतील. उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ बाकावर बसलेल्या खेळाडूंची आज चाचपणी करू शकतील, त्यात महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म हाही चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याला आज विश्रांती देण्याची शक्यता आहे.
सलामी - रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हीच जोडी भारताच्या डावाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचा सामना डोळ्यासमोर ठेवून संघ व्यवस्थापक सलामीच्या जोडीत कोणताही प्रयोग करण्याचा धोका ओढावणार नाही. रोहितने या स्पर्धेत 7 सामन्यांत 90.66च्या सरासरीनं 544 धावा केल्या आहेत, त्याता चार शतकांचा व एका अर्धशतकाचा समावेश आहे.
कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, त्याने आतापर्यंत 7 सामन्यांत 58.28च्या सरासरीनं 408 धावा केल्या आहेत.
चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतलाच संधी मिळेल. त्याने बांगलादेशविरुद्ध 48 धावांची खेळी केली.
उपांत्य फेरीचा सामना लक्षात घेता व्यवस्थापक या लढतीत धोनीला विश्रांती देऊ शकतात आणि त्याच्या जागी दिनेश कार्तिककडे यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवू शकतात. कार्तिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
केदार जाधवला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पण, आज त्याला संधी मिळू शकते.
हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडणार आहे.
आजच्या सामन्यात रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. जडेजाच्या समावेशाने भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. शिवाय युजवेंद्र चहलसह तो फिरकीची जबाबदारीही सांभाळेल.
जलदगती गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावरच असेल. पण, या सामन्यात बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.