लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारताने या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळवला.
पण भारत हे अव्वल स्थान कायम राखणार का, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर समजू शकणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर भारताला अव्वल स्थान कायम राखता येईल आणि त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना करावा लागेल. पण जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि त्यांचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडशी होईल.
श्रीलंकेच्या २६५ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना रोहित आणि राहुल यांनी दमदार १८९ धावांची सलामी दिली. रोहितने या शतकासह एका विश्वचषकात पाच शतके लगावण्याचा इतिहास रचला, त्याचबरोबर या विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये अव्वल स्थानही पटकावले. रोहितने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या. राहुलचे हे विश्वचषकातील पहिले शतक ठरले. राहुलने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १११ धावा केल्या.
अँजेलो मॅथ्यूजचे शतक आणि लहिरू थिरीमानेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना 264 धावांपर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने यावेळी ११३ धावांची खेळी साकारली, तर थिरीमानेने ५३ धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराने यावेळी सर्वाधिक तीन बळी मिळवले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे पहिल्या काही षटकांत समोर आले. कारण श्रीलंकेला आपले चार फलंदाज फक्त ५५ धावांमध्ये गमवावे लागले. पण त्यानंतर मात्र अँजेलो मॅथ्यूज आणि लहिुरु थिरीमाने यांनी शतकी भागीदारी रचली आणि संघाला स्थैर्य मिळवून दिले. मॅथ्यूजने या सामन्यात शतक झळकावले, पण थिरीमानेला मात्र अर्धशतकावरच समाधान मानावे लागले. थिरीमानेने चार चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.
भारताच्या चारही विकेट्मध्ये धोनीचाच हात, संघासाठी ठरतोय बोनसभारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने आपले पहिले चार फलंदाज ५५ धावांत गमावले. पण या चारही भारताच्या यशामध्ये धोनीचाच हात असल्याचे समोर आले आहे. धोनीवर आतापर्यंत विश्वचषकात बरीच टीका झाली, पण त्याचे मार्गदर्शन संघासाठी बोनस ठरत आहे.
श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बाद केले. पण या दोन्ही फलंदाजांचे झेल धोनीनेच पकडले. त्यानंतर श्रीलंकेला तिसरा धक्का रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बसला. यावेळी कुशल परेराचा झेलही धोनीनेच टीपला. गेल्या सामन्यातील शतकवीर अविष्का फर्नांडो हा श्रीलंकेचा चौथा फलंदाज यावेळी बाद झाला. हार्दिक पंड्याने अविष्काला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. पण यावेळी अविष्काचा झेल पकडला तो धोनीनेच. त्यामुळे आतापर्यंतच्या चारही विकेट्समध्ये धोनीचाच हात असल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहासविश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती.
अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वलश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आता या सामन्यातही शतक झळकावत रोहित क्रिकेट विश्वातील इतिहासाला गवसणी घालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
श्रीलंकेने भारतापुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने अर्धशतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या अर्धशतकासह रोहित यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी या यादीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा ६०६ धावांसह अव्वल स्थानावर होता. त्यावेळी रोहित हा ५४४ धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात ६३ धावा करत रोहितने या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.