लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती.
श्रीलंकेने भारतापुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने अर्धशतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या अर्धशतकासह रोहित यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी या यादीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा ६०६ धावांसह अव्वल स्थानावर होता. त्यावेळी रोहित हा ५४४ धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात ६३ धावा करत रोहितने या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
जसप्रीत बुमराहचा विक्रम, सर्वात जलद बळींचे शतक करणारा दुसरा भारतीय
भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शनिवारी विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने हा विक्रम नोंदवला. डावाच्या चौथ्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमरानहे श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला (10) यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले. वन डे क्रिकेटमधील बुमराहचा हा शंभरावा बळी ठरला. भारताकडून सर्वात बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 57व्या सामन्यात ही कामगिरी केली.
भारताकडून सर्वाद जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 सामन्यांत हा पराक्रम केला आहे. त्यापाठोपाठ इरफान पठाण ( 59 सामने) , झहीर खान ( 65 सामने ), अजित आगरकर ( 67 सामने ) आणि जवागल श्रीनाथ ( 68 सामने) यांचा क्रमांक येतो. बुमराह या क्रमवारीत दुसरा येतो.
वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''
भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.''