Ruturaj Gaikwad, India Vs Sri Lanka : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऋतुराजला वन डे मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नव्हती आणि आता विंडीजविरुद्धची मालिकेतही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यानेही तसे संकेत दिले आहेत. Sportstar ला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीनं पुजारा व रहाणे यांच्या फॉर्माबाबत मत व्यक्त केले. या दोघांनी आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून धावा करायला हव्यात, असे मत गांगुलीने व्यक्त केले. यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांना संघात स्थान नसेल, हे स्पष्ट होत आहे.
गांगुली म्हणाला,''ही दोघं खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी करंडक स्पर्धेत ही दोघं खेळून खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही. तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी. त्यांनी आधीही रणजी करंडक स्पर्धा खेळली आहे. ''
त्यात आता समोर आलेल्या बातमीनुसार शुबमन गिल हाही या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे. अशात मधली फळी भक्कम करण्यासाठी कसोटी संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २५ वर्षीय ऋतुराजने २१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८.५४च्या सरासरीने १३४९ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय ६४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५४.७३च्या सरासरीने ३२८४ धावा केल्या आहेत.
Web Title: India Vs Sri Lanka : Ruturaj Gaikwad might be drafted in the Test team with Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara won't be selected for the Test series against Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.