कोलंबो, दि. 24 - दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेने 50 षटकात आठ बाद 236 धावा केल्या. श्रीलंकेकडून सिरीवरदनाने सर्वाधिक (58) धावांची अर्धशतकी खेळी केली. सिरीवरदना आणि कपुगेंदरामध्ये सातव्या विकेटसाठी झालेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
कपुगेंदराने (40) धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. यजुवेंद्र चहलने दोन तर, हार्दिक पांडया आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाल्लीकल येथे भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. सलामीवीर डिकवेला (31), गुणतालिका (19) आणि उपुल थरंगा (9) धावांवर बाद झाले. बुमराहने डिकवेलाला (31) धवनकरवी झेलबाद केले तर, गुणतालिकाला (19) चहलच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टीचीत केले. हार्दिक पटेलच्या गोलंदाजीवर थरंगाने (9) स्लीपमध्ये कोहलीच्या हातात सोपा झेल दिला.
भारत आणि श्रीलंकेमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना होत असून, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्विप’ करणा-या भारतीय संघाने पहिली वन डेदेखील नऊ गडी राखून सहज जिंकली होती.
शिखर धवनने नाबाद १३२ धावा ठोकून जे दडपण आणले त्यातून लंकेचे गोलंदाज सावरलेच नाहीत. लंकेचे गोलंदाज भारतीय संघाला ऑल आऊट करण्यात अपयशी ठरल्याने निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कसोटी मालिकेदरम्यान पहिल्या आणि सातव्या स्थानावरील संघांमधील फरक स्पष्टपणे जाणवला. दाम्बुला येथे वन डेत तिस-या स्थानावरील भारत आणि आठव्या स्थानावरील लंका संघाच्या कामगिरीत किती तफावत आहे, हे दिसून आले. लंकेला २०१९च्या विश्वचषकाची पात्रता मिळविण्यासाठी किमान दोन वन-डे जिंकावे लागतील. असे न झाल्यास ३० सप्टेंबरपर्यंतच्या मर्यादेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत हा संघ मागे पडेल. त्यासाठी लंकेच्या फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागेल. या संघातील आघाडीचे फलंदाज धावा काढतात; पण मध्यम आणि तळाचे फलंदाज योगदान देत नाहीत, ही मुख्य समस्या आहे.
भारतीय फलंदाजी क्रमात कोहली बदल करतो का, हे पाहावे लागेल. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांना संधी देण्यासाठी कोहली असे करू शकतो. या शिवाय अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्यासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बेजबाबदार फटके मारू नका : थरंगा
पाहुण्या संघाला कडवे आव्हान द्यायचे झाल्यास बेजबाबदार फटके मारू नका, असा इशारा लंकेचा कर्णधार उपुल थरंगा याने सहकारी फलंदाजांना दिला. मोठ्या धावा उभारण्यासाठी पहिल्या चार फलंदाजांनी चांगली कामगिरी करावी. एखाद्या फलंदाजाने शतक ठोकल्यास आम्ही ३०० वर धावा उभारू शकतो. दुर्दैवाने पहिला सामना गमविला तरी मला सहकाºयांच्या क्षमतेवर विश्वास आहे. दुसºया वन डेत भरघोस कामगिरीद्वारे विजय मिळवू, असा विश्वास थरंगाने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.