Join us  

IND vs SL : विराट कोहली विश्रांती घेणार, रवींद्र जडेजाचे पुनरागमन होणार; जाणून घ्या कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार

India vs Sri Lanka Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 3:55 PM

Open in App

India vs Sri Lanka Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा कसोटी कर्णधार ठरणार आहे. या मालिकेतून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पुनरागमन करणार आहे. २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीनंतर जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या निवडीबाबत अजूनही साशंकता आहे. पण, तंदुरुस्ती चाचणीत तो यशस्वी ठरला, तर त्याचे पुनरागमन निश्चित आहे. तो ट्वेंटी-२० मालिकेतही खेळू शकेल.  

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार जडेजा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला होता. तो आता लखनौ येथे दाखल झाला आहे आणि तिथे २४ फेब्रुवारीला पहिला ट्वेंटी-२० सामना होणार आहे. तो लखनौ येथे क्वारंटाईनमध्ये आहे आणि त्याची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ती निगेटिव्ह आल्यास त्याचा ट्वेंटी-२० संघात समावेश केला जाईल. जडेजासह जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही पुनरागमन अपेक्षित आहे. या दोघांना विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली गेली होती.

रोहित शर्मा बनणार कसोटी कर्णधार 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळणार आहे आणि कर्णधारपदी रोहित शर्माचीच निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोहली ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती घेण्याची शक्यता आहे.   

भारत विरुद्ध श्रीलंका सुधारित वेळापत्रक

  • पहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौ
  • दुसरी ट्वेंटी-२० -  २६ फेब्रुवारी, धर्मशाला
  • तिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशाला
  • पहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहाली
  • दुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट),  बंगळुरू 
टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीरवींद्र जडेजारोहित शर्मा
Open in App