पल्लेकेले - भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या युगाची सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात गोलंदाज आणि फलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीनं भारतानं आघाडी घेतली. टी २० संघाचा नवीन कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतानं सर्वात मोठी खेळी केली. केवळ २६ चेंडूत सूर्याच्या बॅटीनं ५८ रन्स काढल्या. त्यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
१६ वेळा बनला प्लेयर ऑफ द मॅच
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने १६ व्यांदा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला आहे. सूर्याने २०२१ मध्ये भारतीय संघात एन्ट्री घेतली. करिअरच्या सुरुवातीपासून टी २० फॉर्मेटमध्ये सूर्याचा दबदबा पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या ६९ मॅचमध्ये त्याने १६ वेळा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला आहे. सरासरी पाहिली तर प्रत्येक ४-५ सामन्यानंतर सूर्यकुमार यादव भारताच्या टी २० साठी प्लेयर ऑफ द मॅच बनतो.
विराट कोहलीची बरोबरी
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्यामध्ये सूर्यकुमार यादवनं विराट कोहलीची बरोबरी केली आहे. टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराटनं भारतासाठी १२५ टी २० सामने खळले. सूर्याने जवळपास अर्ध्या मॅचमध्येच विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली.
टी २० मध्ये सर्वाधिक प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार१६ - सूर्यकुमार यादव (६९ सामने)१६ - विराट कोहली (१२५ सामने)१५ - सिकंदर रझा (९१ सामने)१४ - मोहम्मद नबी (१२९ सामने)१४ - रोहित शर्मा (१५९ सामने)१४ - विरनदीप सिंग (७८ सामने)
मॅचमध्ये काय घडलं?
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी २० मध्ये श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार आणि आघाडीच्या फलंदाजांच्या बळावर भारताने सात गडी गमावून २१३ धावांची मोठी मजल मारली. या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात करून दिली मात्र असे असतानाही संघ १९.२ षटकांत १७० धावांपर्यंतच मर्यादित राहिला. सलामीवीर पाथुम निसांकाने संघासाठी ७९ धावांची अर्धशतकी खेळी खेळली.