मोहाली : भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा फलंदाज गमावले. मात्र त्याचवेळी लंकेच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देताना भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३५७ धावा फटकावल्या. तसेच कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या विराट कोहलीच्या शतकी खेळीची प्रतीक्षा या सामन्यातही कायम राहिली. तो ४५ धावा काढून परतला. ऋषभ पंतने आक्रमक अर्धशतकी खेळी, पण त्याचे शतक केवळ ४ धावांनी हुकल्याची हुरहुर सर्वांना लागली.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच कसोटीत नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने फलंदाजी निर्णय घेतला. कसोटी पदार्पणामध्ये आणि कसोटीत पहिल्यांदाच सलामीला खेळताना रोहितने शतकी खेळी केली होती. त्यामुळे कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करतानाही तो मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. ६ खणखणीत चौकार मारत त्याने चांगली सुरुवातही केली. मात्र, वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराला आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २८ चेंडूंत २९ धावा केल्या. त्याने मयांक अग्रवालसह ५२ धावांची सलामी दिली. मयांक ४९ चेंडूंत ३३ धावा काढून बाद झाल्यानंतर हनुमा विहारी-कोहली यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी करत भारताला सावरले.
कोहली चांगल्या स्थितीत दिसत असताना लसिथ एम्बुल्डेनियाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर काही वेळाने विहारीही १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा काढून बाद झाला. विहारीने भारतात खेळताना पहिल्यांदाच अर्धशतक ठोकले.
दोन स्थिरावलेले फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने भारताची २ बाद १७० धावांवरून ४ बाद १७५ अशी घसरगुंडी उडाली. येथून भारताला भक्कम स्थितीत आणले ते ऋषभ पंतने. त्याने आधी श्रेयस अय्यर सोबत (२७) पाचव्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली. धनंजय डीसिल्व्हाने अय्यरला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर पंतने रवींद्र जडेजासह लंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांचा तडाखा दिला. परंतु , सुरंगा लकमलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाल्याने त्याला शतकापासून ४ धावांनी दूर रहावे लागले.
दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जडेजा (४५*) आणि रविचंद्रन अश्विन (१०*) खेळपट्टीवर नाबाद होते. लंकेकडून एम्बुल्डेनियाने २ बळी घेतले. लकमल, विश्वा फर्नांडो, लाहिरु कुमारा आणि डीसिल्वा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मयांक अग्रवाल पायचीत गो. एम्बुल्डेनिया ३३, रोहित शर्मा झे. लकमल गो. कुमारा २९, हनुमा विहारी झे. फर्नांडो ५८, विराट कोहली त्रि.गो. एम्बुल्डेनिया ४५, ऋषभ पंत त्रि.गो. लकमल ९६, श्रेयस अय्यर पायचीत गो. डीसिल्वा २७, रवींद्र जडेजा खेळत आहे ४५, रविचंद्रन अश्विन खेळत आहे १०. अवांतर - १४. एकूण : ८५ षटकात ६ बाद ३५७ धावा. बाद क्रम : १-५२, २-८०, ३-१७०, ४-१७५, ५-२२८, ६-३३२.
गोलंदाजी : सुरंगा लकमल १६-१-६३-१; विश्वा फर्नांडो १६-१-६९-१; लाहिरु कुमारा १०.५-१-५२-१; लसिथ एम्बुल्डेनिया २८-२-१०७-२; धनंजय डीसिल्वा ११-१-४७-१; चरिथ असलंका ३.१-०-१४-०.