पुणे: पुणे येथील एमसीएच्या गहुंजे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार दासून शनाका (नाबाद ५६) आणि कुसाल मेंडिस (५२) यांच्या बेधडक फटकेबाजीच्या बळावर नाणेफेक गमावल्यानंतर लंकेने २० षटकात ६ बाद २०६ धावा उभारल्या. २०७ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या भारताला त्यांनी २० षटकात ८ बाद १९० धावांवर रोखले. तिसरा सामना शनिवारी राजकोट येथे खेळला जाईल.
कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून दिली आणि भारताच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. पण, युझवेंद्र चहलने पहिले यश मिळवून दिले. उम्रान मलिकने पुन्हा एकदा वेगाने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या सामन्यात १५५ kmph च्या वेगाने उम्रानने चेंडू टाकला होता अन् आजही त्याने भन्नाट वेगवान चेंडू टाकून भानुका राजपक्षाचा त्रिफळा उडवला. मात्र या सामनादरम्यान उमरान मलिक युझवेंद्र चहलवर भडकल्याचे देखील दिसून आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताला पहिल्या तीन षटकांतच तीन धक्के बसले. कुसल रजिताने इशान किशन (२), शुभमन गिल (५) यांना, तर पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दिलशान मधुशंकाने ५ धावांवर बाद केले. कर्णधार हार्दिक १२ धावा कढून पाचव्या षटकात माघारी फिरला. दीपक हुड्डा (९) बाद होताच ५ बाद ५७ धावा झाल्या. सूर्या अक्षर यांनी सहाव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करीत रंगत आणली, पण सूर्या ३६ चेंडूंत ५१ धावा काढून परतला.
अक्षरने ३१ चेंडूंत ६५ धावा केल्या. तो २० षटकांत तिसऱ्या चेंडूवर बाद होताच भारताच्या आशा संपुष्टात आल्या. त्याआधी लंकेचे सलामीवीर कुसाल मेंडिस पथुम निसंका यांनी आठ षटकांत ८० धावा केल्या. शनाका-करुणारत्ने या जोडीने अखेरच्या पाच षटकांत ७७ धावांची भागीदारी करीत २०० धावांचा टप्पा गाठून दिला. कर्णधार शनाकाने २२ चेंडूत धावा दोन चौकार, सहा षटकारांसह ५६, तर कुसालने ३१ चेंडूंत ०४ चार षटकार आणि तीन चौकारांसह ५२ धावांचे योगदान दिले. भारताकडून उमरान मलिकने तीन, अक्षर पटेलने दोन आणि युझवेंद्र चहलने एक गडी बाद केला.
अर्शदीपने टाकले पाच 'नो बॉल'
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने स्वतःच्या पहिल्या षटकात तीन नो बॉल टाकले. त्यानंतर डावातील १९ व्या षटकात त्याने पुन्हा दोन नो बॉल टाकले. दोन षटके गोलंदाजी करणाया या डावखुऱ्या गोलंदाजाने ३७ धावा मोजल्या. शिवम मावीने चार षटकांत ५३ धावा दिल्या, पण त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"