India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कुलदीप यादवने पुनरागमनाचा सामना गाजवला आणि मोहम्मद सिराजने त्याला साजेशी साथ दिली. फलंदाजीत लोकेश राहुलने संयमी खेळ करताना भारताचा विजय निश्चित केला. भारताने हा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबर केली. दरम्यान, इडन गर्डनवर झालेल्या या सामन्यात विराट कोहली व इशान किशन यांचा डान्स चर्चेला आला आहे ( Virat Kohli and Ishan Kishan Dance). अनेकांना हा डान्स पाहून RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याची आठवण झाली.
कुलदीप व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. अविष्का फर्नांडो ( २०), कुसल मेंडिस ( ३४) यांनी चांगला खेळ केला. पदार्पणवीर नुवानिदू फर्नांडोने अर्धशतक झळकावताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा ( १७) व शुभमन गिल ( २१) यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( २८ ) हेही माघारी परतले. लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांनी श्रीलंकेच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले. या दोघांनी संयमी खेळ करताना ११९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ५३ चेंडूंत ३६ धावांवर माघारी परतला.
लोकेश १०३ चेंडूंत ६ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला, कुलदीपने नाबाद १० धावा केल्या. भारताने ४३.२ षटकांत ६ बाद २१९ धावा करून विजय मिळवला. भारताचा वन डे क्रिकेटमधील श्रीलंकेवरील हा ९५ वा विजय ठरला आणि वन डे क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरोधात सर्वाधिक विजयाच्या ऑस्ट्रेलियाच्या ( वि. न्यूझीलंड) वर्ल्ड रेकॉर्डशी भारताने बरोबरी केली.
पाहा भन्नाट डान्स....
अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ५५० कोटी रुपये खर्चून बनविलेल्या ‘आरआरआर’नं बुधवारी आपले नाव कोरले. या गाजलेल्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट मूळ तेलुगू भाषेतील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली, मात्र सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट श्रेणीत या चित्रपटाला स्थान मिळाले नाही. नाटू नाटू’ हे गाणे एम. एम. किरावानी यांनी संगीतबद्ध केले असून, ते काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे. नृत्यदिग्दर्शन प्रेम रक्षित यांनी केले आहे. गीते चंद्रबोस यांनी ते लिहिले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs Sri Lanka : Virat Kohli dancing with Ishan Kishan after the match at the Eden Gardens, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.