नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. श्रीलंकेचा संघ तीन ट्वेंटी-२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत मोहाली येथे होईल आणि तो विराटचा १००वा कसोटी सामना असेल.
आरसीबीचा कर्णधार राहिलेल्या विराटला बंगळुरू येथील मैदानावर १००वा कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुधारीत वेळापत्रकानुसार १२ ते १६ मार्च या कालावधीतील दुसरी कसोटी बंगळुरूला डे-नाईट पद्धतीने होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धची पुन्हा टी-२० मालिका खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधाराची अद्याप घोषणा झालेली नाही, परंतु रोहितच नेतृत्व सांभाळेल ही शक्यता आहे.