कोलंबो : भारतीय युवा (19-वर्षांखालील) संघाने श्रीलंकेतील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यातही चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 143 धावांत रोखले. त्यानंतर अनुज रावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सहा फलंदाज आणि 77 चेंडू राखून पूर्ण केले.
भारताच्या अजय देव गौडने भेदक मारा करत 18 धावांत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद केले. अजयला अन्य गोलंदाजांची सुयोग्य साथ मिळाली आणि त्यामुळे भारताला श्रीलंकेचा 143 धावांत खुर्दा उडवता आला. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना यावेळी दोनअंकी धावसंख्याही ओलांडता आली नाही.
श्रीलंकेच्या आव्हानाचा सहजपणे भारताने पाठलाग केला. भारताच्या अनुजने 85 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी साकारली आणि भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.