कोलंबो, दि. 3- श्रीलंके विरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातही टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये असून, चहानपानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 58 षटकात तीन बाद 238 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पूजारा आणि अजिंक्य रहाणेची जोडी खेळपट्टीवर असून, पूजाराने शानदार शतक फटकावले आहे. दोघांमध्ये नाबाद शतकी भागादारी झाली आहे. अजिंक्य रहाणेनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
लोकेश राहुलने दमदार पुनरागमन करताना अर्धशतकी खेळी केली. तो (57) धावांवर धावबाद झाला. कर्णधार विराट कोहलीला आज सूर गवसला नाही. त्याला हेराथने मॅथ्यूजकरवी झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन (35) धावांवर बाद झाला. त्याला परेराने पायचीत केले. शिखर धवन आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली होती.
लोकेश राहुल फीट झाल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असून, सलामीवीर अभिनव मुकुंदला वगळण्यात आले आहे. पहिल्या कसोटीत अभिनव मुकुंद पहिल्या डावात अपयशी ठरला होता.पण दुस-या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली होती.
पहिल्या सामन्याआधी ‘व्हायरल’मुळे राहुल खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवन-अभिनव मुकुंद यांनी सलामीवीरांची भूमिका निभावली होती. भारताने हा सामना ३०४ धावांनी सहज जिंकला होता. भारत कसोटी क्रमवारीत अव्वल तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. वर्षभराआधी श्रीलंकेने आॅस्ट्रेलियाला ३-० ने नमविले होते; पण आता परिस्थिती बदलली. त्या वेळी खेळपट्ट्या वेगळ्या होत्या शिवाय लंकेचा मारा अधिक भेदक होता.
राहुलचे धडाक्यात पुनरागमन होईल : कोहलीव्हायरलमुळे पहिल्या कसोटीस मुकलेला लोकेश राहुल दुसºया सामन्यात धडाकेबाज पुनरागमन करेल, असा विश्वास कर्णधार विराट कोहली याने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.कोहली म्हणाला, ‘राहुल नियमित सलामीवीर आहे. त्यामुळे धवन अथवा मुकुंद यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. राहुलने गेली दोन वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने तो पुनरागमनाचा हकदार आहे. माझ्या मते, राहुल अंतिम एकादशमध्ये असेल. तो धडाकेबाज फलंदाजी करेल, असा मला विश्वास आहे.’धवन किंवा मुकंद यापैकी कुणाला बाहेर बसावे लागेल, असे विचारताच मुकुंदला बाहेर राहावे लागेल, असे कोहलीने संकेत दिले. आम्ही सर्वोत्कृष्ट संयोजनासह उतरणार असून, खेळाडू व्यावसाायिक असल्याने संघाच्या हितावह निर्णय घेतले जातात, हे त्यांना माहिती असल्याचे कोहलीने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.