India vs Pakistan will face on 15th October : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे चाहते २३ ऑक्टोबरची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्याची लाखभर तिकीटांची विक्रीही झाली आहे. अशात IND vs PAK चाहत्यांना आणखी पर्वणी देणारी बातमी समोर येत आहे. येत्या शनिवारी म्हणजे १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. महिलांच्या आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकमेकांसमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासह थायलंड, पाकिस्तान व श्रीलंका यांनी आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने ६ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तालिकेत अव्वल स्थान पटकावताना उपांत्य फेरीत धडक मारली. पाकिस्तानी महिलांनीही १० गुणांसह अंतिम चार संघांत स्थान पटकावले, परंतु नेट रन रेटमुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीलंका ८ गुणांसह तिसऱ्या व थायलंड ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. स्पर्धा नियमानुसार उपांत्य फेरीत तालिकेतील अव्वल संघ चौथ्या क्रमांकाशी आणि दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघात होणार आहे.
त्यामुळे पहिल्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध थायलंड आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. साखळी फेरीत भारतीय महिलांनी थायलंडचा ३६ चेंडूंत पराभव करून विक्रम रचला होता. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा विजय निश्चित मानला जातोय. आज पाकिस्तानने साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत श्रीलंकेवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यामुळे उपांत्य फेरीतही असाच निकाल अपेक्षित आहे. त्यानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला फायनल होऊ शकते. भारताने सहा वेळा आशिया चषक उंचावला असला तरी यंदा साखळी फेरीत त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्याची आयती संधी हरमनप्रीत कौर अँड टीमला मिळणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"