नवी दिल्ली : विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी 'विरो' या टोपण नावाने ओळखली जात आहे. या जोडीने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 323 धावांचे लक्ष्य या जोडीसमोर माफक ठरले. भारताने हे लक्ष्य 8 विकेट आणि 47 चेंडू राखून पार केले. विराटने 140, तर रोहितने नाबाद 152 धावा चोपल्या. या जोडीसमोर 400 धावांचे लक्ष्यही कमीच असल्याचे मत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने व्यक्त केले.
तो म्हणाला,'' 322 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडू रिलॅक्स होते. या लक्ष्यानंतर त्यांनी भारतीय संघावर दडपण निर्माण करणे अपेक्षित होते. ज्यांनी या सामन्यात चांगली खेळी केली, त्या फलंदाजांनी आणखी काही काळ खेळपट्टीवर टिकणे आवश्यक होते. शतकानंतर शिमरॉन हेटमेयर लगेच माघारी परतला. कायरेन पॉवेलनेही टिकून खेळ करताना संघाला 400 धावांपर्यंत मजल मारून द्यायला हवी होती. त्यानंतरही हा सामना विंडीज जिंकले असते, याची शास्वती देता आली नसती.''
लारा पुढे म्हणाला, ''दुसऱ्या वन डे सामन्यात विंडीजला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडींवर सुधारणा करावी लागणार आहे. विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर 350 धावा होतीलच असे नाही. त्यामुळे धावा करण्याच्या संधी सोडता कामा नये. भारतीय संघासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे राहिल, असा खेळ करायला हवा.''