भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण दिलं. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करून दिली. पण, पहिल्याच षटकात दोघांमधील ताळमेळ चुकलेला पाहायला मिळाला. सुदैवानं फलंदाज धावबाद झाला नाही. या दोघांनी संयमी खेळ केला, परंतु सातव्या षटकात भारताला जबर धक्के बसले. शेल्डन कोट्रेलच्या त्या षटकात भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( 6) शिमरोन हेटमायरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं चौकार मारून खातं उघडलं, परंतु अखेरच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. पण, या सामन्यात अनपेक्षित 12व्या खेळाडूमुळे काही काळ खेळ थांबवावा लागला.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. अल्झारी जोसेफनं विंडीजला तिसरं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदाजीवर पुल मारण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. रोहितनं 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावा केल्या. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यामुळे सर्व जबाबदारी अचानक मधल्या फळीवर आली. श्रेयस आणि रिषभ पंत यांनी सावध खेळ करताना संघाचा धावांचा आलेख संथगतीनं चढता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेसाठी 68 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या जोडीनं खेळपट्टीवर तग धरल्यानंतर विंडीज गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
श्रेयस अय्यरनं 70 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. त्यानंतर रिषभनेही अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 49 चेंडूंत हा पल्ला गाठला. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले.