ठळक मुद्देमालिकेपूर्वी शिखर धवन व भुवनेश्वर कुमारची माघारमयांक अग्रवाल व शार्दूल ठाकूर यांना संघात स्थानसलामीला तीन पर्याय, केदार जाधवचेही पुनरागमन
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन डे सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध सलग दहावी द्विदेशीय मालिका जिंकण्याकडे विराट कोहली आणि टीम इंडियाची नजर असेल. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यासह कर्णधार कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या बळावर टीम इंडियानं ट्वेंटी-20 मालिका 2-1 अशी खिशात घातली. पण, ही मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला दोन धक्के बसले. सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू जायबंदी झाले. त्यामुळे त्यांना वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यांच्या जागी मयांक अग्रवाल आणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.
धवनच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या मयांकला आजच्या सामन्यात रोहित शर्मासोबत सलमीला येण्याची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, लोकेश राहुलही शर्यतीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत राहुलनं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड आहे. वन-डे मालिकेतही सलामीची जबाबदारी रोहित-राहुल यांच्याकडेच दिली जाईल. श्रेयस अय्यर देखील संधीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्याला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळू शकते.
गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरलेला यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या कामगिरीकडेही नजर असेल. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी जोडीला चेन्नईच्या खेळपट्टीवर एकत्र संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. भुवीनं माघार घेतल्यानं जलदगती माऱ्याची जबाबदारी अनुभवी मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्याकडे असेल. केदार जाधव पुनरागमन करणार आहे, तर शिवम दुबेचा अतिरिक्त अष्टपैलू म्हणून संघात समावेश होऊ शकतो.
असा असेल संघरोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, दीपक चहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी