India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आणि रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुकेश कुमारने कसोटीपाठोपाठ वन डे संघातही पदार्पण केले. मोहम्मद सिराजला दुखापतीमुळे अचानक मालिकेतून माघार घेत मायदेशी परतावे लागले. त्यामुळे हार्दिक पांड्याने आज गोलंदाजीची सुरुवात केली आणि तिसऱ्याच षटकात त्याने विकेट मिळवून दिली. हार्दिकच्या गोलंदाजीवर कायल मेयर्सने पुढे येऊन फटका मारला, परंतु मिड ऑनला रोहितने सोपा झेल टिपला. आजच्या सामन्यात संजू सॅमसन याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु रोहितने इशान किशनवरच विश्वास दाखवला.
भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीला आजपासून सुरूवात झाली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत भारतात होणार आहे आणि त्यासाठीचा संघ जवळपास निश्चित आहे. फक्त काही रिकाम्या जागा टीम इंडियाला भरायच्या आहेत आणि त्यासाठी आजपासून पुढे होणाऱ्या १५ वन डे लढती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इशानला कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी दिल्यानंतर वन डे मालिकेत विश्रांती दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण, रोहितने इशानला कायम ठेवले. युजवेंद्र चहलही आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर दिसला. संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी त्याची जर्सी घालून सूर्यकुमार यादव मैदानावर होता. त्यामुळे चाहते काही काळ संभ्रमात पडले.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उम्रान मलिक, मुकेश कुमार.