India vs West Indies, 1st ODI Live Marathi : अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात बाद झाल्यानंतर निराश झाला आणि मैदानावरील पंचांशी वाद घालताना दिसला. शार्दूल पहिल्या वन डेत ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. लेगस्पिनर यानिक कारियाने त्याला १ धावेवर बाद केले. १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, कारियाने ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि शार्दूलच्या बॅटला लागून तो दुसऱ्या स्लीपवर अॅलिक अथानाझेकडे गेला आणि त्याने जबरदस्त झेल पकडला.
आऊट झाल्यानंतर शार्दूल ठाकूर तात्काळ पंचांकडे गेला आणि त्याने बाद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तो काही गडबडीमुळे खेळण्यास तयार नसल्याचे संकेत देत साइटस्क्रीनकडे इशारा करताना दिसला. मात्र, पंच निगेल डुगुइड आणि मायकेल गॉफ यांनी त्याला मैदान सोडण्यास भाग पाडले.
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादव ( ४-६) व रवींद्र जडेजा ( ३-३७) यांच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर इशान किशनच्या ( ५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने २२.५ षटकांत ५ विकेट्स राखून विजय मिळवला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आज फलंदाजीला नेहमीच्या क्रमांकावर न येता युवा खेळाडूंना संधी दिली.
रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत पाठवला. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्रने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली. ११५ धावांचे माफक लक्ष्य असताना रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला.
रोहितने आज इशान व शुबमन यांना सलामीला पाठवले. शुबमन ( ७), सूर्यकुमार यादव ( १९), हार्दिक पांड्या ( ५), शार्दूल ठाकूर ( १) हे आघाडीला येऊनही फार काही करू शकले नाही. इशानने ४६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. भारताने २२.५ षटकांत ५ बाद ११५ धावा करून मॅच जिंकली.