India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात चांगली सुरूवात केली आहे. हार्दिक पांड्याने जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व सांभाळताना तिसऱ्या षटकात विकेट मिळवला. पदार्पणवीर मुकेश कुमार आणि शार्दूल ठाकूर यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद ४५ अशी केली आहे. रवींद्र जडेजाने अफलातून झेल घेताना विंडीजच्या तगड्या फलंदाजाला माघारी पाठवले, शार्दूलनेही दांडे उडवले. ( IND vs WI Live Scoreboard )
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आणि रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुकेश कुमारने कसोटीपाठोपाठ वन डे संघातही पदार्पण केले. मोहम्मद सिराजला दुखापतीमुळे अचानक मालिकेतून माघार घेत मायदेशी परतावे लागले. त्यामुळे हार्दिक पांड्याने आज गोलंदाजीची सुरुवात केली आणि तिसऱ्याच षटकात त्याने विकेट मिळवून दिली. हार्दिकच्या गोलंदाजीवर कायल मेयर्सने पुढे येऊन फटका मारला, परंतु मिड ऑनला रोहितने सोपा झेल टिपला. ( पाहा व्हिडीओ )
ब्रेंडन किंस आणि एलिक अथानेझ यांनी चांगला खेळ केला होता. कसोटी मालिकेत अथानेझने पदार्पण करताना आपले कौशल्य दाखवून दिले होते आणि त्यामुळेच त्याला वन डेत संधी दिली गेली. हार्दिकला त्याने मारलेला षटकात अप्रतिम होता. त्याने १८ चेंडूंत ३ चौकारही लगावले अन् २२ धावा केल्या. पण, पदार्पणवीर मुकेशने टाकलेल्या चेंडूवर मारलेला फटका फसला अन् रवींद्र जडेजाने अफलातून झेल घेतला. त्यानंतर पुढील षटकात ब्रेंडन किंग ( १७) चा शार्दूलने त्रिफळा उडवला.