भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळीसह चौथ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 8 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली. केदार जाधव आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीनंही अर्धशतकी भागीदारी करताना संघांच्या धावसंख्येत भर घातली. अय्यर 88 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 70 धावा केल्या. रिषभनं 69 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावा केल्या. केदार जाधव व रवींद्र जाडेजा यांनी अखेरची काही षटकं खेळून काढताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. केदार 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 40 धावांवर माघारी परतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 11 धावांवर पहिला धक्का बसला. दीपक चहरनं पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुनील अॅब्रीसला ( 9) पायचीत केले. त्यानंतर शिमरोन हेटमायर व शे होप खेळपट्टीवर संयमी खेळ करत होते. 11 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर होपचा झेल रोहित शर्मानं स्लीपमध्ये सोडला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 14व्या षटकात विराट कोहलीनं हेटमारला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. होपनं मारलेला चेंडू विराटनं अडवला, परंतु होप आणि हेटमायर यांच्यावर धाव घेण्यावरून ताळमेळ राहिला नाही. अशात विराटनं लगेच थ्रो केला असता, तर ही जोडी तुटली असती.
हेटमारयनं फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. होप आणि हेटमायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. दुसरीकडे शे होप एका बाजूनं खेळपट्टीवर नांगर रोवून उभा होता. त्यानं भारताविरुद्ध वन डे सामन्यांत 500 धावांचा पल्ला ओलांडला. होपनं 92 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. होपच्या अर्धशतकी धावेमुळे या जोडीनं 150 धावांची भागीदारी केली. हेटमायरनं वन डे क्रिकेटमधील पाचवे शतक पूर्ण केले. त्यानं 85 चेंडूंत शतक पूर्ण केले.
भारताविरुद्ध त्याचे हे दुसरे शतक ठरले. त्यानं 2018मध्ये भारताविरुद्ध भारतातच शतक झळकावले होते. भारताविरुद्ध यजमानांविरुद्ध शतक करणाऱ्या विंडीज खेळाडूंमध्ये हेटमायरनं तिसरे स्थान पटकावले. त्यानं दोन शतकी खेळीसह दिग्गज फलंदाज सर व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात ख्रिस गेल व मार्लोन सॅम्युअल्स तीन शतकांसह आघाडीवर आहेत.
Web Title: India Vs West Indies, 1st ODI: Most Odi 100s by WI Batsmans vs IND in India, Shimron Hetmyer equal with sir Viv Richards
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.