भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ः किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण दिलं. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करून दिली. पण, पहिल्याच षटकात दोघांमधील ताळमेळ चुकलेला पाहायला मिळाला. सुदैवानं फलंदाज धावबाद झाला नाही. या दोघांनी संयमी खेळ केला, परंतु सातव्या षटकात भारताला जबर धक्के बसले. शेल्डन कोट्रेलच्या त्या षटकात भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( 6) शिमरोन हेटमायरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं चौकार मारून खातं उघडलं, परंतु अखेरच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. अल्झारी जोसेफनं विंडीजला तिसरं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदाजीवर पुल मारण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. रोहितनं 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावा केल्या. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यामुळे सर्व जबाबदारी अचानक मधल्या फळीवर आली. श्रेयस आणि रिषभ पंत यांनी सावध खेळ करताना संघाचा धावांचा आलेख संथगतीनं चढता ठेवला.
विराटची विकेट घेत कोट्रेलनं इतिहास घडवला. आतापर्यंत विंडीजच्या एकाही गोलंदाजाला विराटला एकाहून अधिकवेळा त्रिफळाची करता आले नव्हतं. कोट्रलनं दोनवेळा विराटची दांडी उडवली आहे. यापूर्वी रवी रामपॉल, केमार रोच, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शेनॉन गॅब्रीएल आणि मार्लोन सॅम्युअल्स यांनी एकवेळाच विराटला त्रिफळाचीत केले आहे.
पाहा व्हीडीओ...