गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. विश्वचषकात न्यूझीलंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर वन डेत भारताचा हा पहिलाच सामना असेल. जखमी शिखर धवन याचे संघात पुनरागमन झाल्यामुळे लोकेश राहुल चौथ्या स्थानावर खेळण्याची शक्यता आहे.
भारताकडून १३० सामन्यात १७ शतके ठोकणारा शिखर रोहित शर्मासोबत सलामीला येईल. कर्णधार विराट कोहली मात्र स्वत:च्या पसंतीच्या तिसऱ्या स्थानावरच फलंदाजी करणार आहे. केदार जाधव पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळण्याची शक्यताअसून ऋषभ पंत याच्या कामगिरीकडेही विशेष लक्ष असेल. मधल्या फळीसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात चढाओढ असेल.पांडे टी-२० मध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने संघ व्यवस्थापनाकडून अय्यरला प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आठवडाभरात तीन टी-२० सामने खेळणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला विश्रांती दिल्यास मोहम्मद शमी याचे पुनरागमन होईल, तसेच नवदीप सैनी वन डेत पदार्पण करू शकतो. पंत आणि कृणाल पांड्यासारख्या खेळाडूंनी धावा काढून तसेच बळी घेत कोहलीला प्रभावित केले. टी-२० मध्ये कृणालला अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसरीकडे ख्रिस गेल संघात परतल्यामुळे यजमान संघाला टी-२० मालिकेत पराभवानंतरही आशा आहे. भारताविरुद्धची मालिका गेलची अखेरची मालिका असेल.
संभाव्य संघ भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीपयादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.
वेस्टइंडीज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.