भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. सलामीवीर माघारी झटपट परतूनही शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं पहिला सामना 8 विकेट राखून जिंकला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 218 धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. हेटमायरनं वन डे कारकिर्दीतले पाचवे शतक झळकावताना विंडीजला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. होपनंही शतकी खेळी करताना विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. हेटमायर आणि होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार कामगिरी करून विक्रमाची नोंद केली. ही जोडी आणखी टीकली असती तर 36 वर्षांपूर्वीचा दिग्गजांचा विक्रम मोडला असता.
टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळीसह चौथ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 8 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली. केदार जाधव आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीनंही अर्धशतकी भागीदारी करताना संघांच्या धावसंख्येत भर घातली. अय्यर 88 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 70 धावा केल्या. रिषभनं 69 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावा केल्या. केदार जाधव व रवींद्र जाडेजा यांनी अखेरची काही षटकं खेळून काढताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. केदार 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 40 धावांवर माघारी परतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 11 धावांवर पहिला धक्का बसला. दीपक चहरनं पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुनील अॅब्रीसला ( 9) पायचीत केले. त्यानंतर शिमरोन हेटमायर व शे होप खेळपट्टीवर संयमी खेळ करत होते. 11 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर होपचा झेल रोहित शर्मानं स्लीपमध्ये सोडला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 14व्या षटकात विराट कोहलीनं हेटमारला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. होपनं मारलेला चेंडू विराटनं अडवला, परंतु होप आणि हेटमायर यांच्यावर धाव घेण्यावरून ताळमेळ राहिला नाही. अशात विराटनं लगेच थ्रो केला असता, तर ही जोडी तुटली असती.
हेटमारयनं फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. होप आणि हेटमायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. दुसरीकडे शे होप एका बाजूनं खेळपट्टीवर नांगर रोवून उभा होता. त्यानं भारताविरुद्ध वन डे सामन्यांत 500 धावांचा पल्ला ओलांडला. होपनं 92 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हेटमायरनं वन डे क्रिकेटमधील पाचवे शतक पूर्ण केले. त्यानं 85 चेंडूंत शतक पूर्ण केले. भारताविरुद्ध त्याचे हे दुसरे शतक ठरले. हेटमायर 103 धावांवर असताना श्रेयस अय्यरनं सोपा झेल सोडला. 39व्या षटकात मोहम्मद शमीनं त्याला बाद केले. हेटमायरनं 106 चेंडूंत 11 चौकार 7 षटकार खेचून 139 धावा चोपून काढल्या.
हेटमायर बाद झाल्यानंतर विंडीजचा खेळ मंदावला. होपच्या अती सावध खेळामुळे विंडीज पराभवाच्या छायेत जातोय की काय असं वाटत होतं. चेंडू आणि धावा यांच्यात शर्यत सुरू झाली होती. त्यामुळे दोन्ही संघांच्या चमूत चिंतेचेच वातावरण होतं. होपनं 149 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डे तील त्याचे हे 8 वे शतक ठरले. त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले, या सामन्यापूर्वी त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं. विंडीजनं 8 विकेट राखून हा सामना जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजनं चेन्नईत सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला. त्यांनी 1996 सालचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 287 धावांचा विक्रम मोडला.
या सामन्यात हेटमायर आणि होप यांनी अनेक विक्रम केले. पण, त्यांना सर व्हीव्हीयन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रिनीज यांनी नोंदवलेला विक्रम मोडता आला नाही. अवघ्या तीन धावांनी हेटमायर-होप जोडीला अपयश आलं. रिचर्ड्स आणि ग्रिनीज यांनी भारताविरुद्ध 1983मध्ये 221 धावांची भागीदारी केली होती आणि विंडीज जोडीची ती सर्वोत्तम भागीदारी आहे. काल हेटमायर आणि होप यांनी 218 धावांची भागीदारी करून या विक्रमात दुसरे स्थान पटकावलं.