किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण दिलं. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करून दिली. पण, पहिल्याच षटकात दोघांमधील ताळमेळ चुकलेला पाहायला मिळाला. सुदैवानं फलंदाज धावबाद झाला नाही. या दोघांनी संयमी खेळ केला, परंतु सातव्या षटकात भारताला जबर धक्के बसले. शेल्डन कोट्रेलच्या त्या षटकात भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( 6) शिमरोन हेटमायरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं चौकार मारून खातं उघडलं, परंतु अखेरच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. अल्झारी जोसेफनं विंडीजला तिसरं यश मिळवून दिलं. त्याच्या गोलंदाजीवर पुल मारण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. रोहितनं 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावा केल्या. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यामुळे सर्व जबाबदारी अचानक मधल्या फळीवर आली. श्रेयस आणि रिषभ पंत यांनी सावध खेळ करताना संघाचा धावांचा आलेख संथगतीनं चढता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेसाठी 68 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या जोडीनं खेळपट्टीवर तग धरल्यानंतर विंडीज गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
श्रेयस अय्यरनं 70 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. त्यानंतर रिषभनेही अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 49 चेंडूंत हा पल्ला गाठला. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. 36व्या षटकात रिषभ पंतला जीवदान मिळालं. पण, अल्झारी जोसेफनं 37व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आणली. अय्यर 88 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 70 धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभनं फटकेबाजी करताना संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. पण, किरॉन पोलार्डनं चतुराईनं त्याला बाद केलं. पोलार्डच्या संथ चेंडूवर फटका मारण्याच्या नादात रिषभ झेलबाद झाला. त्यानं 69 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावा केल्या.
केदार जाधव व रवींद्र जाडेजा यांनी अखेरची काही षटकं खेळून काढताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. केदार 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 40 धावांवर माघारी परतला. किमो पॉलनं त्याला पोलार्डकरवी झेलबाद केले. 48 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजच्या खेळाडूंनी नाराजी प्रकट केली. रिल्पेमध्ये रवींद्र जडेजा धावबाद झाल्याचे दिसत होते, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितलीच नाही. पण, जेव्हा रिप्लेत हे दिसले, तेव्हा मैदानावरील पंचानं तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि जडेजाला बाद जाहीर करण्यात आले. अंपायरच्या या निर्णयानंतर विराट कोहली भडकला.
पाहा व्हिडीओ...