भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या शतकी खेळीनं भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताचे 288 धावांचे लक्ष्य विंडीजनं 8 विकेट राखून सहज पार केले. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यानंतर विंडीज संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) ही कारवाई करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया कारण...
विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. टीम इंडियाची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत ( 71) आणि श्रेयस अय्यर ( 70) यांनी दमदार खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. केदार जाधव ( 40), रोहित शर्मा ( 36) आणि रवींद्र जडेजा ( 21) यांनी हातभार लावला. भारतानं 7 बाद 287 धावा केल्या. विंडीजनं हे लक्ष्य 47.5 षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. शिमरोन हेटमायरनं 106 चेंडूंत 11 चौकार व 7 षटकारांसह 139 धावा केल्या, तर शे होपनं 151 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 102 धावा केल्या.
या सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे विंडीजवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयसीसीच्या मॅच रेफरींच्या एलिट पॅनलचे सदस्य डेव्हीड बून यांनी ही कारवाई केली. आयसीसीच्या नियमातील 2.22 कलमांतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विंडीजला मॅच फीमधील 80 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. विंडीजचा कर्णधार पोलार्डनं ही शिक्षा मान्य केली आहे.
हेटमायर-होपनं इतिहास रचला, 36 वर्षांपूर्वीचा विक्रम थोडक्यात वाचला
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. सलामीवीर माघारी झटपट परतूनही शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं पहिला सामना 8 विकेट राखून जिंकला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 218 धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात हेटमायर आणि होप यांनी अनेक विक्रम केले. पण, त्यांना सर व्हीव्हीयन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रिनीज यांनी नोंदवलेला विक्रम मोडता आला नाही. अवघ्या तीन धावांनी हेटमायर-होप जोडीला अपयश आलं. रिचर्ड्स आणि ग्रिनीज यांनी भारताविरुद्ध 1983मध्ये 221 धावांची भागीदारी केली होती आणि विंडीज जोडीची ती सर्वोत्तम भागीदारी आहे. काल हेटमायर आणि होप यांनी 218 धावांची भागीदारी करून या विक्रमात दुसरे स्थान पटकावलं.