India vs West Indies 1st Test : भारतीय संघ २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कॅरेबियन दौऱ्यावर आहे आणि बुधवारपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्या पदार्पणाची चर्चा सूरू आहे. रोहित शर्मासह ओपनिंगला यशस्वी खेळणार असल्याचे बोलले जात आहे आणि शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर ( चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत) खेळण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल गाजवणाऱ्या यशस्वीच्या फलंदाजीवर सर्वांचे लक्ष आहे. अशात भारतीय संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याने या लढतीपूर्वी यशस्वीला सल्ला दिला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताच्या WTC 2025 च्या हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्यावरून होणार आहे आणि भविष्याचा विचार करून BCCI ने युवा खेळाडूंना या मालिकेत संधी दिली आहे. यशस्वीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६ सामन्यांत ८०च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि मागच्या वर्षी दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये त्याने २६५ धावांची अफलातून खेळी केली होती. आयपीएल २०२३ मध्ये त्याने ४८च्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत २०२० मध्ये यशस्वी सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
२१ वर्षीय उदयोन्मुख खेळाडूला अजिंक्यने सल्ला दिला आहे. तो म्हणाला,''मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे, त्याच्यात प्रतिभा कुटून भरलेली आहे. मुंबईसाठी त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि आयपीएल २०२३ ही गाजवले आहे. सर्वात महत्त्वाचे तो ज्या प्रकारे तो रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळतोय, ते कौतुकास्पद आहे. मागच्या वर्षी त्याने दुलीप ट्रॉफीत दमदार खेळी केली होती. मी त्याला एवढंच सांगेन, की तू जसा फलंदाजी करतोस तसाच कर... आंतरराष्ट्रीय क्रिकेट याचा अधिक विचार करू नको. मैदानावर उतर आणि ज्या मोकळेपणाने, बिनधास्तपणे खेळतोस तसाच खेळ.''