नॉर्थ साऊंड: वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमधील 10वे शतक झळकावले. मात्र हनुमा विहारीला शतक झळकविण्यास अपयश आले. त्याने 128 चेंडूत 93 धावा करत रहाणेसोबत महत्वपूर्ण पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. मात्र, 419 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलता आले नाही. त्यांचा डाव 100 धावांमध्ये आटोपला.
तत्पूर्वी सामनाच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विराट कोहली 51 धावांवर बाद झाला होता. तसेत रहाणे शतक केल्यानंतर ग्रिब्रेलच्या गोलंदाजीवर 102 धावा करत बाद झाला. तसेच विकेटकीपर ऋषभ पंतला देखील साजेशी खेळी खेळता आली नाही. हनुमा विहारी 93 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित करत वेस्ट इंडिजला 419 धावांचे आव्हान दिले आहे.
त्याचप्रमाणे 419 धावांचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिजने पहिली विकेट 7 धावांवरच गमावली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज क्रिग ब्रेथवेट 1 धावा करत स्वस्तात माघारी परतला.
यानंतर 10 धावांवर वेस्टइंडिजने आणखी दोन विकेट गमावल्या. यानंतर झालेली पडझड वेस्ट इंडीजला रोखता आली नाही. त्यांची 50 धावांवर 9 वी विकेट गेली होती. के रोचने एकाकी झुंज देत पराभव आणखी 50 धावांनी लांब नेला. मात्र, 100 धावसंख्येवर असताना रोच बाद झाला आणि पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. भारताकडून जसप्रित बुमराने सर्वाधिक पाच बळी घेतले. इशांत शर्माने तीन तर मोहम्मद शामीने दोन बळी मिळविले. रोचने 38 धावा तर कमीन्सने 19 धावा केल्या.