rohit sharma on wtc final : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे कसोटी आणि वन डे मालिका खेळणार आहे. आजपासून कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात असणार आहे. त्यामुळे चाहत्यांसह सर्व क्रिकेटप्रेमी रोहितसेनेकडे आशेने पाहत आहे. आज होणाऱ्या सामन्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या सामन्यापूर्वी संघातील खेळाडू १०० टक्के तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. यंदा आम्ही चांगले क्रिकेट खेळले आहे पण कधी कधी नशीब हा घटक देखील एक मोठी भूमिका बजावतो, असे रोहितने सांगितले.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपली रणनीती स्पष्ट केली. यावेळी बोलताना रोहितने म्हटले, "संघातील सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरूस्त असावेत असे मला वाटते. संघात दुखापतीची मालिका नसावी असेही सर्वांनाच वाटते. कारण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एकूणच या वर्षामध्ये आम्ही चांगले क्रिकेट खेळले आहे. पण कधी कधी नशीब तुमच्या पाठीशी असावे अशी तुमची इच्छा असते. वास्तविक मागील पाच-सहा वर्षांत आम्ही अनेक सामने जिंकलो आहोत. पण होय, चॅम्पियनशिप जिंकणेही महत्त्वाचे आहे. ती चॅम्पियनशिप मिळेपर्यंत आम्ही त्यासाठी मेहनत करत राहू."
WTC फायनलमध्ये हवा तसा निकाल मिळाला नाही - रोहित रोहित शर्माने आणखी सांगितले की, भारतासाठी आपण कोणतीही मालिका खेळत असलो तरी ती आव्हानात्मक असते. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आम्ही दोन्ही WTC चे अंतिम सामने खेळले पण आम्हाला हवा तसा निकाल मिळवता आला नाही. हा एक नवीन संघ असून नव्या खेळाडूंचा साठा आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर चांगला खेळतो. घरच्या मैदानावर त्यांचा विक्रम चांगला असून ते आम्हाला नक्कीच आव्हान देतील. पण मला आशा आहे की, आम्ही या आव्हानाचा स्वीकार करू आणि चांगले क्रिकेट खेळू.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)