Join us  

India vs West Indies, 1st Test : विराट हे वागणं बरं नव्हे, माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दिला सल्ला

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 260 धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 3:43 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 260 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात अंतिम अकरामध्ये बदल करण्याची परंपरा कायम राखली. कोहलीनं मागील 38 कसोटीत अंतिम अकरामध्ये बदल केले आहेत आणि त्याची पुनरावृत्ती विंडीजविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत येणाऱ्या कसोटीत टीम इंडियाने आर अश्विनला बाकावर बसवले. कोहलीच्या या वागण्यावर माजी कर्णधार सौरव गांगुलीनं नाराजी प्रकट केली.

तो म्हणाला,''सतत संघ बदलत राहण्याच्या गोष्टीवर विराटने विचार करायला हवा. त्याने संघात सातत्य राखण्याची गरज आहे. ज्या खेळाडूंची निवड करशील त्यांना सातत्य राखण्याची संधी द्यायला हवी. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, लय सापडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. हे मी यापूर्वीही सांगितले आहे. श्रेयस अय्यरने वन डे मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याची निवड करायला हवी आणि त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. श्रेयससारखे अनेक खेळाडू आहेत, त्यांना संधी व वेळ देणे गरजेचे आहे. विराट असे करेल असा विश्वास आहे.''

''कुलदीप यादवला संधी न मिळाल्याचे मला आश्चर्य वाटले. त्याने अखेरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता आणि त्यात पाच विकेट्सही घेतल्या होत्या. जडेजाही चांगल्या फॉर्मात आहे. अँटिग्वाची खेळपट्टीपाहता तीन जलदगती गोलंदाज संघात असणे महत्वाचे होते,''असे गांगुली म्हणाला.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती झालेल्या रवी शास्त्रींकडूनही अपेक्षा उंचावल्या असल्याचे गांगुली म्हणाला.''रवी शास्त्री यांनी संघासोबत नुकतेच पाच वर्ष पूर्ण केले आणि त्यांना आणखी दोन वर्षांची मुदत दिली आहे. त्यामुळे आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ( ट्वेंटी-20) स्पर्धेत भारत विजय मिळवेल, अशी आशा आहे.''

दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करताना संघाला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांचा पल्ला गाठून दिला. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसौरभ गांगुलीविराट कोहली