अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करताना संघाला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांनी या कामगिरीसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर कसोटीतील दुर्मिळ विक्रम मोडला. या मालिकेपूर्वी रहाणेला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. पण, कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 81 धावा करताना संघाला 297 धावांचा डोंगर उभा करून दिला. दुसऱ्या डावातही रहाणेच्या खेळीत सातत्य पाहायला मिळाले. त्याने कर्णधार कोहलीसह संघाचा डाव सावरला. उपकर्णधार आणि कर्णधार जोडीनं चौथ्या विकेटसाठी आठवी शतकी भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी तेंडुलकर व गांगुली यांचा चौथ्या विकेटसाठीचा सात शतकी भागीदारीचा विक्रम मोडला. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांत गुंडाळत भारताने पहिल्या डावात 75 धावांची आघाडी घेतली होती. रहाणे 53 आणि कोहली 51 धावांवर खेळत आहेत. चौथ्या दिवशी ही जोडी भारताची आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. गांगुली आणि तेंडुलकर यांनी चौथ्या विकेटसाठी 7 शतकी भागीदारी करताना 44 डाव खेळून काढले, तर रहाणे व कोहली या जोडीनं 39 डावांत 8 शतकी भागीदारी केल्या. पण, चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या बाबतीत रहाणे व कोहली ही जोडी तेंडुलकर व गांगुलीपेक्षा पिछाडीवर आहे. रहाणे व कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी 2439 धावा जोडल्या आहेत, तर तेंडुलकर व गांगुली यांच्या नावावर 2695 धावा आहेत. तत्पूर्वी, चहापानापर्यंत भारताने 37 षटकांत 3 बाद 98 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजला उपहारानंतर बळी मिळवण्यासाठी फार वेळ वाट बघावी लागली नाही. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेस याने मयांक अग्रवालला पायचीत केले. त्यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संयमी खेळी करत होते. दोघांनी दुसºया गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. त्याला देखील रोस्टन चेस याने बाद केले. त्याने 85 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. पुजारादेखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही. केमार रोचच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 53 चेंडूत 25धावा केल्या.